श्री व्यंकटेश स्तोत्र
श्रीगणेशाय नमः । श्री व्यंकटेशाय नमः । ॐ नमो जी हेरंबा ।सकळादि तूं प्रारंभा । आठवूनि तुझी स्वरुपशोभा । वंदन भावें करीतसे ॥ १ ॥
नमन माझे हंसवाहिनी । वाग्वरदे विलासिनी । ग् रंथ वदावया निरुपणी । भावार्थखाणी जयामाजी ॥ २ ॥
नमन माझे गुरुवर्या । प्रकाशरुपा तूं स्वामिया । स्फूर्ति द्यावी ग्रंथ वदावया । जेणें श्रोतया सुख वाटे ॥ ३ ॥
नमन माझे संतसज्जना । आणि योगियां मुनिजनां । सकळ श्रोतयां सज्जना । नमन माझे साष्टांगी ॥ ४ ॥
ग्रंथ ऐका प्रार्थनाशतक । महादोषासी दाहक । तोषूनियां वैकुंठनायक । मनोरथ पूर्ण करील ॥ ५ ॥
जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा । परंज्योति प्रकाशगहना । करितों प्रार्थना श्रवण कीजे ॥ ६॥
जननीपरी त्वा पाळिलें । पितयापरी त्वां सांभाळिले । सकळ संकटापासूनि रक्षिलें । पूर्ण दिधलें प्रेमसुख ॥ ७ ॥
हें अलोलिक जरी मानावें । तरी जग हें सृजिलें आघवें । जनकजनीपण स्वभावें । सहज आलें अंगासी ॥ ८ ॥
दीनानाथा प्रेमासाठी । भक्त रक्षिले संकटी । प्रेम दिधलें अपूर्व गोष्टी । भजनासाठी भक्तांच्या ॥ ९ ॥
आतां परिसावी विज्ञापना । कृ पाळुवा लक्ष्मीरमणा । मज घालोनी गर्भाधाना । अलौकिक रचना दाखविली ॥ १०॥
तुज न जाणतां झालों कष्टी । आतां दृढ तुझे पायीं घातली मिठी । कृपाळुवा जगजेठी । अपराध पोटीं घालीं माझें ॥ ११ ॥
माझिया अपराधांच्या राशी । भेदोनि गेल्या गगनासी । दयावंता हृषीकेशी । आपुल्या ब्रीदासी सत्य करीं ॥ १२ ॥
पुत्राचे सहस्त्र अपराध । माता काय मानी तयाचा खेद । तेवीं तू कृपाळू गोविंद । मायबाप मजलागी ॥ १३ ॥
उदडांमाजी काळेगोरे । काय निवडावें निवडणारे । कुचलिया वृक्षांची फळें । मधुर कोठोनि असतील ॥ १४ ॥
अराटीलागीं मृदुला । कोठोनि असेल कृपावंता । पाषाणासी गुल्मलता । कैसियापरी फुटतील ॥ १५ ॥
आपादमस्तकावरी अन्यायी । परी तुझे पदरीं पडिलों पाहीं । आतां रक्षण नाना उपायीं । करणें तुज उचित ॥ १६ ॥
समर्थाचिये घरीचे श्र्वान । त्यासी सर्वही देती मान । तैसा तुज म्हणवितों दीन । हा अपमान कवणाचा ॥ १७ ॥