शिवलीलामृत अध्याय तिसरा
श्रीगणेशाय नमः ॥
जय जय शिव मंगलधामा । निजजनहृदयआरामा । चराचरफलांकितद्रुमा । नामाअनामातीत तू ॥ १ ॥
इंदिरावरभगिनीनीमनरंजना । षडास्यजनका शफरीध्वजदहना । ब्रह्मानंद भाललोचना । भवभंजना त्रिपुरांतका ॥ २ ॥
हे शिवसद्योजात वामघोरा । तत्पुरुषा ईशान ईश्वरा। अर्धनारीनटेश्वरा । गिरिजारंगा गिरीशा ॥ ३ ॥
गंगाधरा भोगिभूषणा । सर्वव्यापका अंधकमर्दना । परमातेता निरंजना । गुणत्रयविरहित तू ॥ ४ ॥
हे पयःफेनधवल जगज्जीवन । द्वितीयाध्यायीं कृपाकरून । अगाध सुरस आख्यान । शिवरात्रीमहिमा वर्णविला ॥ ५ ॥
यावरी कैसी कथे ची रचना । वदवीं पंचमुकुट पंचानना । शौनकादिकां मुनिजनां । सूत सांगे नैमिष्यारण्यीं ॥ ६ ॥
इक्ष्वाकुवंशी महाराज । मित्रसहनामें भूभुज । वेदशास्त्रसण्पन्न सतेज । दुसरा बिडौजा पृथ्वीवरी ॥ ७ ॥
पृतनावसनेंकरून । घातलें उर्वीस पालाण । प्रतापसूर्य उगवला पूर्ण । शत्रुभणें मावळलीं ॥ ८ ॥
तो एकदा मृगयाव्याजेंकरून । निघाला धुरंधर चमू घेऊन । फ़्होरांदर प्रवेश्ला विपिन । तों सावजें चहूकडून उठलीं ॥ ९ ॥
व्याघ्र वृक रीस वनकेसरी । मृग मृगी वनगौ वानर वानरी । शशकजंबुकांच्या हारी । संहारीत नृपवर ॥ १० ॥
चातक मयूर बदक । कस्तुरीकुरंग जवादिबिडालक । नकुल राजहंस चक्रवाक । पक्षी श्वापदे धावती ॥ ११ ॥
नृपे मारिले जीव बहुवस । त्यात एक मारिला राक्षस । महाभयानक तामस । गतप्राण होऊनि पडियेला ॥ १२ ॥
त्याचा बंधु परम दारुण । तो लक्षिता झाला दुरोन । मनी कापट्य कल्पून । म्हणे सूड घेईन बंधूचा ॥ १३ ॥
मित्रसह पातला स्वनगरास । असुरे धरिला मानववेष । कृष्णवसनवेष्टित विशेष । दर्वी स्कंधी घेऊनिया ॥ १४ ॥
नृपासी भेटला येऊन । म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण । अन्न शाका सुवास करीन । देखोन सुर नर भूलती ॥ १५ ॥
राये ठेविला पाकसदनी । त्यावरी पितृतिथी लक्षुनी । गुरु वसिष्ठ घरालागुनी । नृपश्रेष्ठे आणिला ॥ १६ ॥
भोजना आला अब्जजनंदन । तो राक्षसे कापट्य स्मरून । शाकांत नरमांस शिजवून । ऋषीस आणून वाढिले ॥ १७ ॥
त्रिकाळज्ञानी वसिष्ठमुनी । सकळ ऋषींमाजी शिरोमणी । कापट्य सकळ जाणुनी । मित्रसह शापिला ॥ १८ ॥
म्हणे तू वनी होई राक्षस । जेथे आहार न मिळे निःशेष । मी ब्राह्मण मज नरमांस । वाढिले कैसे पापिया ॥ १९ ॥
राव म्हणे मी नेणे सर्वथा । बोलावा सूपशास्त्री जाणता । तव तो पळाला क्षण न लागता । गुप्तरूपे वना आपुल्या ॥ २० ॥
राव कोपला दारुण । मज शापिले काय कारण । मीही तुज शापीन म्हणो न । उदक करी घेतले ॥ २१ ॥
तव रायाची पट्टराणी । मदयंती नामे पुण्यखाणी । रूपे केवळ लावण्यहरिणी । चातुर्य उपमे जेवी शारदा ॥ २२ ॥
मदयंती म्हणे राया । दूरदृष्टी पाहे विचारूनिया । शिष्ये गुरूसी शापावया । अधिकार नाही सर्वथा ॥ २३ ॥
गुरूसी शाप देता निर्धारी । आपण नरक भोगावे कल्पवरी । राव म्हणे चतुर सुंदरी । बोललीस साच ते ॥ २४ ॥
म्हणे हे उदक खाली टाकू जरी । तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री । मग आपुल्याच प्रपदांवरी । जल टाकी मित्रसह ॥ २५ ॥
तो जानूपर्यंत चरण । दग्ध झाले कृष्णवर्ण । कुष्ठ भरला मग तेथून । कल्माषपाद नाम त्याचे ॥ २६ ॥
वसिष्ठे जाणोनि वृत्तान्त । रायासी उ:शाप देत । म्हणे द्वादशवर्षी होशील मुक्त । येसी स्वस्थाना आपुल्या ॥ २७ ॥
गुरू पावला अंतर्धान । मग कल्माषपाद राक्षस होऊन । क्षुधाक्रांत निशिदिन । वनी भक्षी जीव सर्व ॥ २८ ॥
परम भयानक असुर । विशाळ देह कपाळी शेंदुर । विक्राळ वदन बाहेर शुभ्र । दंतदाढा वाढलिया ॥ २९ ॥
जीव भक्षिले आसमास । वनी हिंडता तो राक्षस । एक ब्राह्मणकुमर डोळस । द्वादशवर्षी देखिला ॥ ३० ॥
सवे त्याची ललना चिमणी । दोघे क्रीडती कौतुके वनी । तव तो ब्राह्मणपुत्र राक्षसे धरूनी । भक्षावया सिद्ध झाला ॥ ३१ ॥
तव त्याची वधू काकुळती येत । अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत । गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य । माझा कांत मारू नको ॥ ३२ ॥
गडबडा लोळे सुंदरी । करुणा भाकी पदर पसरी । सवेचि जाऊनि चरण धरी । सोडी झडकरी पति माझा ॥ ३३ ॥
पतीस भक्षू नको राजेंद्रा । महत्पाप घेऊ नको एकसरा । स्वर्गमार्ग तरी चतुरा । कैसा पावसी अंतकाळी ॥ ३४ ॥
ऐसी करुणा भाकिता कामिनी । निर्दये भक्षिला तेच क्षणी । अस्थिपंजर टाकुनी । तियेपुढे दीधला ॥ ३५ ॥
तव ती दुःखेकरोनी । आक्रोशे कपाळ पिटी धरणी । मृत्तिका घेवोनि घाली वदनी । कोण वनी सावरी तीते ॥ ३६ ॥
मग तिने शाप दि धला रायाते । जो अलोट विधिहरिहरांते । म्हणे मदयंतीसंगसुरते । प्राण जाईल तेचि क्षणी ॥ ३७ ॥
कोणे एके स्त्रीचा संगसोहळा । तुज न घडो रे चांडाळा । ऐसा शाप वदोनि ते वेळा । केल्या गोळा अस्थी पतीच्या ॥ ३८ ॥
तत्काळ प्रवेशली अग्नी । इकडे द्वादशवर्षी शापमुक्त होऊनि । राव स्वनगरा येऊनी । वर्तमान सांगे स्त्रियेसी । ॥ ३९ ॥
येरी कपाळ पिटी आक्रोशेकरोन । म्हणे झाले वंशखंडन । पतीस म्हणे ब्रह्मचर्य धरून । प्राण आपुला रक्षी का ॥ ४० ॥
अनिवार अत्यंत मन । न करी कोणे स्त्रियेसी संभाषण । खदिरांगाराची सेज आजपासून । झाली तुजलागी जाण पा ॥ ४१ ॥
परम तळमळी राजेंद्र । जैसा सापळा कोंडिला व्याघ्र । की त महाभुजंगाचे दंत समग्र । पाडोनि गारुडी दीन करी ॥ ४२ ॥
की नासिकी वेसण घालून । महावृषभ करिती दीन । की बनी निरंकुश वारण । धरून क्षीण करिती मग ॥ ४३ ॥
तैसा कल्माषपाद भूप । होऊनि राहिला दीनरूप । पुढे प्रकाशावया कुळदीप । आपण धर्मशास्त्र पाहातसे ॥ ४४ ॥
तेथींचे पाहोनि प्रमाण । वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन । अमोघ वीर्य पडता पूर्ण । दिव्य पुत्र जाहला ॥ ४५ ॥
तेणे पुढे वंश चालिला । असो तो राव मृगयेस निघाला । यथारण्य तथा गृह वाटे नृपाला । भोग त्यजिले सर्वही ॥ ४६ ॥
मनात मनोजविकार उठत । विवेकांकुशे कामइभ आवरीत । म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य । ते कर्म सहसा न करावे ॥ ४७ ॥
आपुली कर्मगति गहन । प्राक्तन विचित्र दारुण । देवावरी काय बोल ठेवून । भोगिल्यावीण न सुटेचि ॥ ४८ ॥
ऐसा राव उदासयुक्त । वनी हिंडता मागे पहात । तो पिशाच भयानक अत्यंत । रायापाठी उभे सदा ॥ ४९ ॥
दंपत्ये पूर्वी मारिली । ती ब्रह्महत्या पाठीसी लागली । राजा तीर्थे हिंडता सकळी । परी कदाकाळी न सोडी ॥ ५० ॥
न सोडी स्वप्नी जागृतीत । महाविक्राळ दात करकरा खात । राये व्रते केली त बहुत । दान देत बहुसाल ॥ ५१ ॥
ऐसा हिंडता र ाव भागला । मिथुलानगरासमीप आला । वनश्री देखता आनंदला । परी ब्रह्महत्या पाठीसी उभी ॥ ५२ ॥
वृक्ष लागले बहुत । आम्रवृक्ष फळभारे डोलत । पोफळी रातांजन विराजित । केळी नारळी खर्जुरिया ॥ ५३ ॥
चंपक जाई जुई मालती । मोगरे पुन्नागराज शेवंती । मलयागर कृष्णागर जाती । जपा करवीर कोविदार ॥ ५४ ॥
वड पिंपळ औदुंबर । पारिजातक बकुल देवदार । कपित्थ बिल्व अंजिर । अर्जुन पिचुमंद कदंब ते ॥ ५५ ॥
ऐसिया वनामाजी नृपती । क्षण एक पावला विश्रांती । परी ते पाठीसी पापमती । ब्रह्महत्या उभी असे ॥ ५६ ॥
तो उगवला भाग्यवासरमणी । की निधान जोडे रंकालागुनी । की क्षुधितापुढे उचंबळोनी । क्षीराब्धि जैसा पातला ॥ ५७ ॥
की मरतियाच्या मुखात । अकस्मात घातले अमृत । की चिंताग्रस्तासी प्राप्त । चिंतामणी जाहला ॥ ५८ ॥
तैसा तापसियांमाजी मुकुटमणी । शिष्यमांदी सवें घेऊनी । महाराज तपस्वी गौतममुनी । तये स्थानी पातल ा ॥ ५९ ॥
राये घातले लोटांगण । दाटला अष्टभावेकरून । उभा ठाकला कर जोडून । करी स्तवन प्रीतीने ॥ ६० ॥
सहज होता संतदर्शन । पापे संहारती संपूर्ण । तू विलोकिसी जरी कृपा करून । तरी रंक सहस्रनयन होय ॥ ६१ ॥
यावरी तो महाराज गौतम । कल्माषपादा पुसे कुशलक्षेम । राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम । सुखेकरून नांदती की ॥ ६२ ॥
ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र । स्वधर्म आचरती की समग्र । पशु सेवक पुत्र कलत्र । समस्त सुखरूप आहेत की ॥ ६३ ॥
राव म्हणे आपुले कृपेकरून । समस्त आहेत क्षेमकल्याण । परंतु आलासी वाटते दुरून । आनंदघन दिसतोसी ॥ ६४ ॥
तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर । ब्रह्महत्या दूर होईल समग्र । मग पूर्वकर्म आपुले दुस्तर । ऋषीप्रती निवेदिले ॥ ६५ ॥
गौतम म्हणे परम पवित्र । भूकैलास गोकर्णक्षेत्र । तेथूनि मी आलो अपार । महिमा तेथींचा न वर्णवे ॥ ६६ ॥
ॐकाररूपे कैलासनाथ । भवानीसहित तेथे ना ंदत । सुर असुर किन्नर सेवीत । अर्धमात्रापीठ जे ॥ ६७ ॥
त्या गोकर्णींचे शिवदर्शन । ब्रह्मादिकां दुर्लभ जाण । तेथे इंदिरेसहित जनार्दन । तप गहन आचरत ॥ ६८ ॥
कोटिसूर्यांची प्रभा । मृडानीसहित शिव उभा । कैवल्यगर्भाचा पूर्ण गाभा । तेथींची शोभा ने वर्णवे ॥ ६९ ॥
इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र । तेथेचि वसती अहोरात्र । जेथींचे पाषाण तरुवर । समग्र निर्जर अवतरले ॥ ७० ॥
सत्यवतीहृदयरत्न । जेथे करी अनुष्ठान । वसिष्ठ भृगु जामदग्न्य । गोकर्णक्षेत्री सदा वसती ॥ ७१ ॥
पहावया मृडानीनायक । मंडपघसणी होतसे देख । नारद तुंबरु गायक । जेथे गाती शिवलीला ॥ ७२ ॥
गोकर्णाभोवते समग्र । उभे अखंड देवांचे भार । मुखे गर्जती शिव हर हर । आनंद थोर होतसे ॥ ७३ ॥
ऋषि करिती वेदघोष । अष्टनायिकांचे नृत्य विशेष । किन्नर गंधर्व गायक सुरस । तोषविती महेशाते ॥ ७४ ॥
ते अति उत्तम स्थान । तेजोमय प्रकाश गहन । नाना वृक्ष लागले सघन । कैलासभुवन प्रत्यक्ष ॥ ७५ ॥
शुभ्र सिंहासन लेखलखित । चारी द्वारे मणिमयखचित । ऐरावतारूढ अमरनाथ । पूर्वद्वारी तिष्ठतसे ॥ ७६ ॥
दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन । पश्चिमेसी वारुणीरमण । उत्तरेसी वैश्रवण । प्राणमित्र शिवाचा ॥ ७७ ॥
कर्पूरगौर भवानीसहित । घवघवीत तेजे विराजित । भूकैलास साक्षात । माहेर संत-साधकांचे ॥ ७८ ॥
त्या मूर्तीचे करावे ध्यान । त्याभोवते महासिद्धीचे पूजन । त्याभोवते कात्यायनीआवरण । अष्टभैरव पूजिजे ॥ ७९ ॥
द्वादश मित्र एकादश रुद्र । तेथेचि वसती अहोरात्र । अष्टवसु दिक्पाळ समग्र । जोडोनि कर उभे तेथे ॥ ८० ॥
अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी । अखंड आराधिती पिनाकपाणी । रायासी म्हणे गौतममुनी । मीही वसतो सदा तेथे ॥ ८१ ॥
वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण । तप आचरला निर्वाण । गोकर्णी एक दिन । होय प्रसन्न सदाशिव ॥ ८२ ॥
अमावास्या संक्रांति सोमवार । प्रदोष पर्वकाळ शिववास । समुद्रस्नान करिता समग्र । फळ होय सकळ तीर्थांचे ॥ ८३ ॥
रावण कुंभकर्ण बिभीषण । याही पूर्वी केले लेथे अनुष्ठान । ते निर्वाणलिंग दशानने जाण । कैलासाहूनि आणिले ॥ ८४ ॥
गणेशे स्थापिले ते लिंग । ऋषी म्हणती सूताते कथा सांग । ऐकावया लीला सुरंग । श्रवण वाट पाहती ॥ ८५ ॥
यावरी सूत वक्ता निपुण । रावणमातेसी कैकसी अभिधान । ती नित्य लिंगपूजनाविण जाण । उदक प्राशन न करीच ॥ ८६ ॥ पंचधान्यांचे पिष्ट करून । लिंग करी कामना धरोन । व्हावे रावणाचे कल्याण । जय संपूर्ण प्राप्त व्हावा ॥ ८७ ॥
शक्रे तिचे लिंग नेऊन । समुद्री टाकिले द्वेषे करून । त्यालागी रात्रंदिन । रावणमाता अन्न न घे ॥ ८८ ॥
रावण म्हणे मातेलागून । मी मुख्य आत्मलिंग आणितो जाऊन । कैलासाप्रती द्विपंचवदन । जाता झाला साक्षेपे ॥ ८९ ॥
तप आचरला दारुण । जो चतुःषष्टिकलाप्रवीण । जेणे वेदांची खंडे करून । सारासा र निवडिले ॥ ९० ॥
चतुर्दशविद्यापारंगत । शिवासी आवडे अत्यंत । दशमुखे गायन अद्भुत । केले त्याणे स्वामीपुढे ॥ ९१ ॥
आपुले शिर छेदून स्वहस्ते । शिरांच्या तंती करूनि स्वरयुक्त । दशमुख गात प्रेमभरित । उमानाथ संतोषे जेणे ॥ ९२ ॥
राग उपराग भार्यांसहित । मूर्च्छना शरीर कंपित । सप्तस्वर ताल संगीत । शास्त्रप्रमाण गातसे ॥ ९३ ॥
गद्यपद्यरचना नाना कळा । गीत प्रबंध अखंड नाममाळा । गाता प्रीतीने शिवलीला । शंभु तोषला अद्भुत ॥ ९४ ॥
म्हणे प्रसन्न झालो दशमुखा । इच्छित माग तुज प्रिय जे का । दशकद्वयनयन म्हणे कामांतका । आत्मलिंग मज देई ॥ ९५ ॥
या त्रिभुवनात जे सुंदर । ऐसी ललना देई सुकुमार । ऐकून संतोषला कर्पूरगौर । भोळा उदार चक्रवर्ती ॥ ९६ ॥
कोटि चंद्रसूर्याची प्रभा पूर्ण । ऐसे लिंग काढिले हृदयातून । की ब्रह्मानंदरस मुरोन । दिव्य लिंग ओतिलें ॥ ९७ ॥
सहस्र बालसूर्य न पावती सरी । ऐ सी प्रभा पडली दशदिशांतरी । दिधले रावणाचे करी । जे अतर्क्य ब्रह्मादिका ॥ ९८ ॥
जे मुनिजनांचे ध्येय ध्यान । जे सनकादिकांचे देवतार्चन । वेद शास्त्र पुराण । दिव्य लिंग वर्णिती ॥ ९९ ॥
जे त्रिगुणातीत परब्रह्म । जे अज अजित अनाम । सच्चिदानंद निर्वाणधाम । योगी आराम पावती जेथे ॥ १०० ॥
अनंत ब्रह्मांडे विचित्रे । जेणे रचिली इच्छामात्रे । ज्याकारणे भांडती वेदशास्त्रे । ते दिव्य लिंग पुरातन ॥ 10१ ॥
ते लिंग रावणे हाती घेऊन । म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन । लावण्यसागरींचे निधान । त्रिभुवनसुंदर ललना दे ॥ 10२ ॥
जी अपर्णेची अपर प्रतिमा । ऐसी देई मज सर्वोत्तमा । सच्चिदानंद पूर्णब्रह्मा । नामाअनामातीत तू ॥ 10३ ॥
शिव म्हणे इची प्रतिमा विशेष । निर्मू न शके विधीश । भोळा चक्रवर्ती महेश । म्हणे हेचि नेई अपर्णा तू ॥ 10४ ॥
रावणे श्री अवश्य म्हणोनी । स्कंधी घेतली स्कंदजननी । दिव्यलिंग हाती घेऊनी । लंकानाथ चालिला ॥ 10५ ॥
दक्षिणपंथे जाता सत्वर । गजबजिले सकळ सुरवर । गजानन स्कंद वीरभद्र । नंदिकेश्वर तळमळती ॥ 10६ ॥
म्हणती हे सदाशिव त्रिनयन । हे कैसे तुझे उदारपण । भवानी बैसलासी देऊन । पंचवदन हासतसे ॥ 10७ ॥
म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ । तो धावेल आता स्नेहभरित । इकडे भवानी स्तवन करीत । हे पद्मजतात धाव वेगी ॥ 10८ ॥
वारिजनयना इंदिरावरा । निगमागमवंद्या सुहास्यवक्त्रा । हे नीलपयोधरगात्रा । धाव वेगी सोडवी मज ॥ 10९ ॥
हे मधुकैटभनरकमुरभंजना । हे दशावतारधरा पीतवसना । हे मदनांतकमानसरंजना । हे जनार्दना जगद्गुरू ॥ ११० ॥
हे कोटिमनोजतात श्रीधर । असुरमर्दन परम उदार । ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर । विप्ररूपे आडवा आला ॥ 1११ ॥
म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना । कोठे मिळविली ऐसी ललना । दशमुख म्हणे हे अपर्णा । सदाशिवे दीधली ॥ १1२ ॥
विप्र म्हणे खाली उतरून । न्याहाळूनि पाहे इचे वदन । रावण पाहे तव ते कुलक्षण । अत्यंत कुरूप देखिली ॥ १1३ ॥
भुवयास आंठी अमंगळ पूर्ण । वृद्ध गाल बैसले दंतहीन । गदगदा विप्र हासे देखून । टाकोनि रावण चालिला ॥ १1४ ॥
मग रमाधवे तये स्थळी । स्थापिली माता भद्रकाळी । इकडे असुर शिवाजवळी । म्हणे स्त्री अमंगळ कैसी दीधली ॥ १1५ ॥
शिव म्हणे सत्य वचन । ते तुज नाटोपे कौटाळीण । अनंत ब्रह्मांडे दावून । सवेचि लपवील तत्त्वता ॥ १1६ ॥
मग श्रीधरे आंगीची मळी काढून । स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न । मयासुराचे उदरी जाण । उत्पन्न झाली तेच पै ॥ १1७ ॥
तिच्या स्वरूपाची प्रति । नाही नाही त्रिजगती । आंगीच्या सुवासे धावती । काद्रवेयचक्रे प्रीतीने ॥ १1८ ॥
तिचे नाम मंदोदरी । तिची प्रतिमा नाही उर्वीवरी । विंशतिनेत्राचे चत्वरी । पट्टमहिषी पतिव्रता ॥ १1९ ॥
मयासुर करील कन्यादान । वरी एक शक्ति देईल आंदण । सप्तकोटी मंत्रांचे गहन । सामर्थ्य असे जियेम ाजी ॥ १२० ॥
ते निर्वाणसांगातीण शक्ती । तुज प्राप्त होईल लंकापती । महाशत्रूवरी निर्वाणी ती । प्रेरावी त्वा सत्य पै ॥ 1२१ ॥
ऐसे ऐकताचि रावण । परतला लिंग घेऊन । पूर्वस्थळासी आला जाण । तो गजानन गाई राखी ॥ 1२२ ॥
गजाननाचे स्तवन । देव करिती कर जोडून । म्हणती दिव्य लिंग सोडवून । स्थापी अक्षयी गणपती ॥ 1२३ ॥
ऐसा देवी प्रार्थिला एकदंत । तव रावणासी मूत्र लागले बहुत । पुढे पाऊल न घालवत । चरफडीत मूत्रभरे ॥ 1२४ ॥
भूमीवरी लिंग न ठेवावे । ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे । हाती घेऊनि लघुशंकेस बैसावे । हेही कर्म अनुचित ॥ 1२५ ॥
तव तो सिद्धीबुद्धींचा दाता । विप्रवेषे गाई राखिता । त्यासी लंकानाथ म्हणे तत्त्वता । लिंग हाती धरी हे ॥ 1२६ ॥
विप्र म्हणे लंकापती । माझ्या गाई रानोरानी पळती । तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती । लागेल हे न कळे मज ॥ 1२७ ॥
रावण म्हणे न लगता क्षण । येतो मूत्रशंका करून । विप् र म्हणे तीन वेळा बाहीन । न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी ॥ 1२८ ॥
अवश्य म्हणे लंकापती । लिंग देत विप्राच्या हाती । दूर जाऊन एकांतक्षिती । लघुशंकेस बैसला ॥ 1२९ ॥
अगाध गजमुखाचे चरित्र । जो साक्षात् अवतरला इंदिरावर । शिवउपासना करावया पवित्र । झाला पुत्र शंभूचा ॥ १३० ॥
असो रावणासी मूत्राचे पूर । लोटले न सांवरती अनिवार । एक घटिका लोटता इभवक्त्र । हाक फोडी गर्जोनी ॥ 1३१ ॥
माझ्या गाई गेल्या दूरी । हे आपुले लिंग घेई करी । रावण न बोलेचि निर्धारी । हस्तसंकेते थांब म्हणे ॥ 1३२ ॥
दुसरी घटिका झाली पूर्ण । हाक फोडी गजानन । एवं घटिका झाल्या तीन । कदापि रावण न उठेचि ॥ 1३३ ॥
जैसे पाखंडियाचे कुमत । न सरेचि वारिता पंडित । तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य । पुनः एकदंत हाक फोडी ॥ 1३४ ॥
राक्षसा आपुले लिंग सांभाळी । म्हणोनि ठेविले भूमंडळी । अक्षय स्थापिले कदाकाळी । ब्रह्मादिका उपटेना ॥ 1३५ ॥
पृथ्वीसहित अभंग । एकचि झाले दिव्य लिंग । रावण धावे सवेग । अशौच अपवित्र क्रोधभरे ॥ 1३६ ॥
लिंग उपटता डळमळी कुंभिनी । महाबळे दशमुख पाहे उपटोनी । परी न उपटे तयालागुनी । अखंड अभंग जाहले ॥ 1३७ ॥
गुप्त जाहला गजानन । गाई पृथ्वीत जाती लपोन । रावणे एक गाईचा कर्ण । धांवोनिया धरियेला ॥ 1३८ ॥
तोही न उपटे तयालागून । मग तेथेच केले लिंगपूजन । गोकर्ण-महाबळेश्वर तेथून । नाम जाण पडियेले ॥ 1३९ ॥
रावणमाता तेथे येऊन । ते नित्य करी शिवपूजन । आदिलिंग हे जाणोन । करिती अर्चन सुरऋषी ॥ १४० ॥
रावण कुंभकर्ण बिभीषण । तेथेच करिती अनुष्ठान । त्याच्या बळेकरून । देव जिंकले रावणे ॥ 1४१ ॥
मयासुर मंदोदरी आणि शक्ती । देता झाला रावणाप्रती । लक्ष पुत्र नातू गणती । सवा लक्ष जयाचे ॥ 1४२ ॥
इंद्रजिताऐसा पुत्र । अष्टादशाक्षौहिणी सेनाभार । जेथीच्या अनुष्ठाने अपार । रावण पावला संपत्ती ॥ 1४३ ॥
गौतम म्हणे रा जोत्तमा । ऐसा गोकर्णीचा थोर महिमा । वर्णू न शके मघवा ब्रह्मा । येणे आम्हा तेथूनि जाहले ॥ 1४४ ॥
मिथुलेश्वराच्या यागाकारणे । आम्ही येत असता त्वरेने । अद्भुत एक वर्तले तुजकारणे । कथा तेचि सांगतो ॥ 1४५ ॥
एक वृक्ष न्यग्रोध विशाळ । त्याखाली आम्ही बैसलो सकळ । तो एक चांडाळीण अमंगळ । अति अपवित्र देखिली ॥ 1४६ ॥
सर्वरोगवेष्टित पूर्ण । जन्मांध गलितकुष्ठ भरले जाण । किडे पडले सर्वांगी व्रण । दुर्गंधी उठली चहूकडे ॥ 1४७ ॥
रक्तपिती भरोन । हस्तपाद बोटे गेली झडोन । परम कुश्चित कुलक्षण । कैचे अन्न उदक तियेते ॥ 1४८ ॥
दंतहीन कर्णहीन । गर्भाच तियेचे गेले लोचन । कर्ण नासिक झडोन । किडे पडले बुचबुचित ॥ 1४९ ॥
अंगींचे चर्म गेले झडोन । वस्त्र पडले गळोन । धुळीत लोळे चांडाळीण । पाप पूर्वीचे भोगीत ॥ १५० ॥
तिचा मरणकाळ जवळी आला जाण । वरते पाहिले आम्ही विलोकून । तो शिवे धाडिले दिव्य विमान । तिये लागी न्यावया ॥ 1५१ ॥
दशभुज पंचवदन । शिवदूत बैसले चौघेजण । कोटिसूर्यतेज विराजमान । प्रभा शशीसमान एकाची ॥ 1५२ ॥
कोणी अग्नितेजे विराजत । भालचंद्र शोभिवंत । दिव्य विमान लखलखीत । वाद्ये वाजती चतुर्विध ॥ 1५३ ॥
अष्टनायिका नृत्य करिती । किन्नर से गंधर्व शिवलीला गाती । गौतम म्हणे ऐक नृपती । मग तयाप्रती पूसिले ॥ 1५४ ॥
हे दिव्य विमान घेऊन । कोणाचे करू जाता उद्धरण । ते म्हणती तिया चांडाळिणीलागून । शिवे आणू पाठविले निजपदा ॥ 1५५ ॥
मग म्या तयांसी पुसिले । इणे पूर्वी काय तप केले । मग ते शिवदूत बोलिले । पूर्वजन्मीचा वृत्तांत ॥ 1५६ ॥
पूर्वी केकयनामा ब्राह्मण । त्याची कन्या सुमित्रा जाण । आपुल्या सौंदर्य गर्वेकरून कोणासही मानीना ॥ 1५७ ॥
ही बाळपणी विधवा झाली । तारुण्यमदे स्वधर्म विसरली । जारकर्म करू लागली । बापे शिकविल्या नायके ॥ 1५८ ॥
तो हे जाहली गरोदर । लोक निंदा करिती समग् र । मग बापे केश धरूनि सत्वर । बाहेर घातले इयेसी ॥ 1५९ ॥
मग ही हिंडता देशांतर । कोणीएक सभाग्य शूद्र । त्याणे इते स्त्री करूनि सत्वर । समग्र द्रव्य ओपिले ॥ 1६० ॥
तेथे अपत्ये झाली बहुत । ही अत्यंत मद्यमांसी रत । पुष्ट जाहली बहुत । घूर्णित लोचन उघडीना ॥ 1६१ ॥
शूद्र घेवोनि दासीदास । गेला क्षेत्री कृषिकर्मास । हे क्षुधित आठवूनि मांसास । शस्त्र घेवोनि चालिली ॥ 1६२ ॥
मद्ये माजली नुघडी लोचन । हा बस्तचि आहे म्हणोन । गोवत्साचे कंठी जाण । पापिणी सुरी घालीतसे ॥ 1६३ ॥
ते अट्टाहासे ओरडत । गाई त हंबरोनि अनर्थ करीत । इणे कंठ छेदोनि गृहात । वत्स नेले त्वरेने ॥ 1६४ ॥
डोळे उघडूनि पाहे पापिणी । मग गोवत्स ओळखिले ते क्षणी । तेव्हा तिणे शिव अ शिव उच्चारूनी । म्हणे करणी न कळता केली ॥ 1६५ ॥
मग अर्ध वत्समांस भक्षून । उरले टाकी बाहेर नेऊन । लोकांत उठविले पूर्ण । गोवत्स मारिले व्याघ्राने ॥ 1६६ ॥
त्यावरी ही काळे मृत्यु पावत । तो येऊनिया यमदूत । इयेस नेले मारीत । बहुत जाचिती निर्दयपणे ॥ 1६७ ॥
कुंभीपाकी घालिती । असिपत्रवनी हिंडविती । तप्तभूमीवरी लोळविती । स्तंभ कवटाळविती तप्त जे-का ॥ 1६८ ॥
चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन । इचे काही आहे की नाही पुण्य । ते म्हणती शिवनाम उच्चारून । गोवत्सवध इणे केला ॥ 1६९ ॥
मग यमे दिधले लोटून । चांडाळयोनीत पावली जनन । गर्भांध कुश्चळ कुलक्षण । विष्ठामूत्रे भरली सदा ॥ १७० ॥
श्वानाचे उच्छिष्ट भक्षी जाण । तव मायबापे गेली मरोन । मग ही हाती काठी घेऊन । गांवोगांवी हिंडतसे ॥ 1७१ ॥
तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून । गोकर्णक्षेत्राप्रती संपूर्ण । यात्रा चालली घोष गहन । नानाविध वाद्यांचा होतसे ॥ 1७२ ॥
शिवनामाचा घोष अपार । शिवभक्त करिती वारंवार । त्यांच्यासंगे ही दुराचार । चांडाळीही चालिली ॥ 1७३ ॥
गोकर्णक्षेत्रा गेली चांडाळी । पडली भद्र काळीच्या देवळाजवळी । म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी । बहुत पापिणी मी आहे ॥ 1७४ ॥
हाका फोडीत हात पसरून । तो ध्या प्रदक्षिणा करिती भक्तजन । एके बिल्वपत्र नेऊन । तिचे हाती घातले ॥ 1७५ ॥
ते त्रिदळ चांचपोन पाहत । मुखी घालावयाची नाही वस्त । म्हणोनि रागे भिरकावीत । ते पडत शिवलिंगावरी ॥ 1७६ ॥
शिवरात्रीस उपोषण । बिल्वदळे घडले शिवपूजन । शिवभक्तांसवे जागरण । घडले संपूर्ण चांडाळीस ॥ 1७७ ॥
शिवनामे गर्जती जन । हेही करीत तसेचि स्मरण । ती ही वडाखाली येऊन । पडली आहे चांडाळी ॥ 1७८ ॥
ऐसा तिचा पूर्ववृत्तांत । शिवगणी सांगितला समस्त । मग ती दिव्य देह पावोनि बैसत । शिवविमानी तेधवा ॥ 1७९ ॥
आपुले पूर्वकर्म आठवून । करू लागली शिवस्मरण । मग शिवगणी नेऊन । शिवपदी स्थापिली ॥ १८० ॥
गौतम म्हणे ऐक राया सादर । तू गोकर्णाप्रती जाई सत्वर । शिवरात्रीस पार्वतीपरमेश्वर । त्रिदळेकरूनि अर्ची का ॥ 1८१ ॥
ऐसे बोलोनि गौतममुनी । गेला जनकाच्या यागालागुनी । कल्माषपाद तेच क्षणी । गोकर्णक्षेत्री पातला ॥ 1८२ ॥
शिवरात्रीस दिव्य लिंग । मित्रसहराये पूजिले सांग । अंतरी सप्रेम अनुराग । उमारंग संतोषला ॥ 1८३ ॥
ब्रह्महत्येचे पातक विशेष । जाऊनि राव झाला निर्दोष । तो कैलासाहूनि आदिपुरुष । पाठवीत दिव्य विमान ॥ 1८४ ॥
विमानी बैसले शिवगण । परम तेजस्वी देदीप्यमान । अनंत विजांचे रस पिळोन । मूर्ति ओतिल्या वाटते ॥ 1८५ ॥
अनंत वाद्ये गर्जती एक वेळा । तेणे रंगसुरंग दाटला । दिव्य सुमनांच्या माळा । वर्षती वरून वृंदारक ॥ 1८६ ॥
मित्रसह दिव्य देह पावोन । झाला दशभुज पंचानन । इंदचंद्रादिपदे ओलांडून । नेला मिरवत शिवपदा ॥ ८७ ॥
सरूपता मुक्ति पावोन । शिवरूपी मिळाला आनंदघन । धन्य शिवरात्रिव्रत पावन । धन्य गोकर्ण शिवमंदिर ॥ 1८८ ॥
गौतमऋषि परम धन्य । तेणे इतिहास सांगितला पावन । धन्य श्रोते तुम्ह ी सज्जन । श्रवणी सादर बैसला ॥ 1८९ ॥
मानससरोवरवेष्टित । मराळ जैसे विराजित । की निधानाभोवते समस्त । साधक जैसे बैसती ॥ १९० ॥
तरी पंडित तुम्ही चतुर । तुमचे अवधान दिव्यालंकार । देवोनि गौरवा श्रीधर । ब्रह्मानंदेकरूनिया ॥ 1९१ ॥
श्रीमद्भीमातटविलासा । ब्रह्मानंदा आदिपुरुषा । श्रीधरवरदा कैलासविलासा । कथारस वदवी पुढे ॥ 1९२ ॥
श्रीशिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सजन अखंड । तृतीयाध्याय गोड हा ॥ १९३ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
shri shiv leelamrut adhyay 3 shiv lilamrut