शिवलीलामृत अध्याय पहिला
श्रीगणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीसांबसदाशिवाय नमः ।
ॐ नमोजी शिवा अपरिमिता । आदि अनादि मायातीता । पूर्णब्रह्मानंदा शाश्वता । हेरंबताता जगद्गुरो ॥ १ ॥
ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा । अनादिसिद्धा आनंदवनविलासा । मायाचक्रचालका अविनाशा । अनंतवेषा जगत्पते ॥ २ ॥
जय जय विरूपाक्षा पंचवदना । कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या । विश्वंभरा कर्ममोचकगहना । मनोजदहना मनमोहन जो ॥ ३ ॥
भक्तवल्लभ तू हिमनगजामात । भाललोचन नीलग्रीव उमानाथ । मस्तकी स्वर्धुनी विराजित । जातिसुमनहारवत जी ॥ ४ ॥
पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक । यक्षपतिमित्र प्रतापार्क । दक्षमखविध्वंसक मृगांक । निष्कलंक तव मस्तकीं ॥ ५ ॥
विशाळभाळ कर्पूरगौरवर्ण । काकोलभक्षक निजभक्तरक्षणा । विश्चसाक्षी भस्मलेपन । भयमोचन भवहारक जो ॥ ६ ॥
जो सर्गस्थित्यंतकारण । त्रिशूलपाणी शार्दूलचर्मवसन । स्कंदतात सुहास्यवदन । मायाविपिनदहन जो ॥ ७ ॥
जो सच्चिदानंद निर्मळ । शिवशांत ज्ञानघन अचळ । जो भानुकोटितेज अढळ । सर्वकाळ व्यापक जो ॥ ८ ॥
सकलकलिमलदहन कल्मषमोचन । अनंतब्रह्मांडनायक जगरक्षण । पद्यजतातमनरंजन । जननमरणनाशक जो ॥ ९ ॥
कमलोद्धव कमलावर । दशशतमुरव दशशतकर । दशशतनेत्र सुर भूसुर । अहोरात्र ध्याती जया ॥ १० ॥
भव भवांतक भवानीवर । श्मशानवासी गिरां अगोचर । जो स्वर्धुनीतीरविहार । विश्वेश्वर काशीराज जो ॥ ११ ॥
व्योमहरण व्यालभूषण । जो गजदमन अंधकमर्दन । ॐकार महाबलेश्वर आनंदघन । मदगर्वभंजन अज्ञ अजित जो ॥ १२ ॥
अमितगर्भ निगमागमनुत । जो दिगंबर अवयवरहित । उज्जयिनीमहाकाळ काळातीत । स्मरणे कृतांतभय नाशी ॥ १३ ॥
दुरितकाननवैश्वानर । जो निजजनचित्तचकोरचंद्र । वेणुनृपवरमहत्पापहर । घृष्णेश्वर सनातन जो ॥ १४ ॥
जो उमाहृदयपंजरकीर । जो निजजनहदयाब्जभ्रमर । जो सोमनाथ शशिशेखर । सौराष्ट्रदेशविहारी जो ॥ १५ ॥
कैरवलोचन करुणासमुद्र । रुद्राक्षभूषण रुद्रावतार । भीम भयानक भीमाशंकर । तपा पार नाही ज्याच्या ॥ १६ ॥
नागदमन नागभूषण । नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान । ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण । नागाननजनक जो ॥ १७ ॥
वृत्रारिशत्रुजनकवरदायक । बाणवलभ पंचबाणांतक । भवरोगवैद्य त्रिपुरहारक । वैजनाथ अत्यद्भुत जो ॥ १८ ॥
त्रिनयन त्रिगुणातीत । त्रितापशमन त्रिविधभेदरहित । त्र्यंबकराज त्रिदोषानलशांत । करुणाकर बलाहक जो ॥ १९ ॥
कामसिंधुरविदारक कंठीरव । जगदानंदकंद कृपार्णव । हिमनगवासी हैमतीधव । हिमकेदार अभिनव जो ॥ २० ॥
पंचमुकुट मायामलहरण । निशिदिन गाती आम्नाय गुण । नाही जया आदि मध्य अवसान । मल्लिकार्जुन श्रीशैलवासी ॥ २१ ॥
जो शक्रारिजनकांतकप्रियकर । भूजासंतापहरण जोडोनि कर । जेथे तिष्ठत अहोरात्र । रामेश्वर जगद्गुरू ॥ २२ ॥
ऐसिया शिवा सर्वोत्तमा । अजा अजित ब्रह्मानंदधामा । तुझा वर्णावया महिमा । निगमागमां अतर्क्य ॥ २३ ॥
ब्रह्मानंद म्हणे श्रीधर । तव गुणार्णव अगाध थोर । तेथे बुद्धि चित्त तर्क पोहणार । न पावती पार तत्त्वता ॥ २४ ॥
कनकाद्रिसहित मेदिनीचे वजन । करावया ताजवा आणू कोठून । व्योम साठवे संपूर्ण । ऐसे साठवण कोठून आणू ॥ २५ ॥
मेदिनीवसनाचे जळ आणि सिकता । कोणत्या मापे मोजू आता । प्रकाशावया आदित्या । दीप सरता केवी होय ॥ २६ ॥
धरित्रीचे करूनि पत्र । कुधर कज्जल जलधि मषीपात्र । सुरद्रुम लेखणी विचित्र । करूनि लिहित कंजकन्या ॥ २७ ॥
तेह ि तेथे राहिली तटस्थ । तरी आता केवी करू ग्रंथ । जरी तू मनी धरिसी यथार्थ । तरी काय एक न होय ॥ २८ ॥
द्वितीयेचा किशोर इंदु । त्यासी जीर्ण दशी वाहाती दीनबंधू । तैसे तुझे गुण करुणासिंधु । वर्णीतसे अल्पमती ॥ २९ ॥
सत्यवतीहृदयरत्नमराळ । भेदीत गेला तव गुणनिराळ । अंत न कळेचि समूळ । तोही तटस्थ राहिला ॥ ३० ॥
तेथे मी मंदमति किंकर । केवी क्रमू शके महिमांबर । परी आत्मसार्थक करावया साचार । तव गुणार्णवी मीन झालो ॥ ३१ ॥
ऐसे शब्द ऐकता साचार । तोषला दाक्षायणीवर । म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर । आरंभी रस भरीन मी ॥ ३२ ॥
जैसा धरूनि शिशूचा हात । अक्षरे लिहवी पंडित । तैसे तव मुखे मम गुण समस्त । सुरस अत्यंत बोलवीन मी ॥ ३३ ॥
श्रोती व्हावे सावधचित्त । स्कंदपुराणी बोलिला श्रीशुकतात । अगाध शिवलीलामृत ग्रंथ । ब्रह्मोत्तरखंड जे ॥ ३४ ॥
नैमिषारण्यी शौनकादिक सुमती । सूताप्रती प्रश्न करिती । तू चिदाकाशींचा रोहिणीपती । करी तृप्ति श्रवणचकोरा ॥ ३५ ॥
तुवा बहुत पुराणे सुरस । श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष । अगाध महिमा आसमास । दशावतार वर्णिले ॥ ३६ ॥
भारत रामायण भागवत । ऐकता श्रवण झाले तृप्त । परी शिवलीलामृत अद्भुत । श्रवणद्वारे प्राशन करू ॥ ३७ ॥
यावरी वेदव्यासशिष्य सूत । म्हणे ऐका आता देऊनि चित्त । शिवचरित्र परमाद्भुत । श्रवणे पातकपर्वत जळती ॥ ३८ ॥
आयुरारोग्य ऐश्वर्य अपार । संतति संपत्ति ज्ञानविचार । श्रवणमात्रे देणार । श्रीशंकर निजांगे ॥ ३९ ॥
सकळ तीर्थव्रतांचे फळ । महामखांचे श्रेय केवळ । देणार शिवचरित्र निर्मळ । श्रवणे कलिमल नासती ॥ ४० ॥
सकल यज्ञांमाजी जपयज्ञ थोर । म्हणाल जपावा कोणता मंत्र । तरी मंत्रराज शिवषडक्षर । बीजसहित जपावा ॥ ४१ ॥
दुजा मंत्र शिवपंचाक्षर । दोहींचे फळ एकचि साचार । उतरी संसारार्णव पार । ब्रह्माविसुरऋषी हाचि जपती ॥ ४२ ॥
दारिद्र्य दु:ख भय शोक । काम क्रोध द्वंद्व पातक । इतुक्यांसही संहारक । शिवतारक मंत्र जो ॥ ४३ ॥
तुष्टिपुष्टिधृतिकारण । मुनिनिर्जरांसी हाचि कल्याण । कर्ता मंत्रराज संपूर्ण । अगाध महिमा न वर्णवे ॥ ४४ ॥
नवग्रहांत वासरमणि थोर । तैसा मंत्रांत शिवपंचाक्षर । कमलोद्धव कमलावर । अहोरात्र हाचि जपती ॥ ४५ ॥
शास्त्रांमाजी वेदान्त । तीर्थांमाजी प्रयाग अद्भुत । महाश्मशान क्षेत्रांत । मंत्रराज तैसा हा ॥ ४६ ॥
शस्त्रांमाजी पाशुपत । देवांमाजी कैलासनाथ । कनकाद्रि जैसा पर्वतांत । मंत्र पंचाक्षरी तेवी हा ॥ ४७ ॥
केवळ परमतत्त्व चिन्मात्र । परब्रह्म हेचि तारक मंत्र । तीर्थव्रतांचे संभार । ओवाळूनि टाकावे ॥ ४८ ॥
हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी । कैवल्यमार्गींचा प्रकाशतरणी । अविद्याकाननदाहक ब्रह्माग्नी । सनकादिक ज्ञानी हाचि जपती ॥ ४९ ॥
स्त्री शूद्र आदिकरूनी । हाचि जप मुख्य वर्णी । गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरूनी । दिवसरजनी जपावा ॥ ५० ॥
जागृती स्वप्नी येता जाता । उभे असता निद्रा करिता । कार्या जाता बोलता भांडता । सर्वदाही जपावा ॥ ५१ ॥
शिवमंत्रध्वनिपंचानन । कर्णी आकर्णिता दोषवारण । उभेचि सांडिती प्राण । न लागता क्षण भस्म होती ॥ ५२ ॥
न्यास मातृकाविधि आसन । नलगे जपावा प्रीतीकरून । शिव शिव उच्चारिता पूर्ण । शंकर येऊनि पुढे उभा ॥ ५३ ॥
अखंड जपती जे हा मंत्र । त्यास निजांगे रक्षी त्रिनेत्र । आपुल्या अंगाची साउली करी पंचवक्त्र । अहोरात्र रक्षी तया ॥ ५४ ॥
मंत्रजपकांलागुनी । शिव म्हणे मी तुमचा ऋणी । परी तो मंत्र गुरुमुखेकरूनी । घेइंजे आधी विधीने ॥ ५५ ॥
गुरु करावा मुख्य वर्ण । भक्ति वैराग्य दिव्यज्ञान । सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण । या चिन्हेकरून मंडित जो ॥ ५६ ॥
मितभाषणी शांत दांत । अंगी अमानित्व अदंभित्व । अहिंसक अतिविरक्त । तोचि गुरू करावा ॥ ५७ ॥
वर्णानां ब्राह्मणो गुरुः । हा वेदवचने निर्धारू । हा त्यापासोनि मंत्रोच्चारू । करोनि घ्यावा प्रीतीने ॥ ५८ ॥
जरी आपणासी ठावुका मंत्र । तरी गुरुमुरखे घ्यावा निर्धार । उगाचि जपे तो अविचार । तरी निष्फळ जाणिजे ॥ ५९ ॥ कामक्रोधमदयुक्त । जे का प्राणी गुरूविरहित । त्यांनी ज्ञान कथिले बहुत । परी त्यांचे मुख न पहावे ॥ ६० ॥
वेदशास्त्रे शोधून । जरी झाले अपरोक्षज्ञान । करी संतांशी चर्चा पूर्ण । तरी गुरुविण तरेना ॥ ६१ ॥
एक म्हणती स्वप्नी आम्हांते । मंत्र सांगितला भगवंते । आदरे सांगे लोकांते । परी तो गुरुविण तरेना ॥ ६२ ॥
प्रत्यक्ष येऊनिया देव । सांगितला जरी गुह्यभाव । तरी तो न तरेचि स्वयमेव । गुरूसी शरण न रिघता ॥ ६३ ॥
मौजीबंधनाविण गायत्रीमंत्र । जपे तो भ्रष्ट अपवित्र । वराविण वऱ्हाडी समग्र । काय व्यर्थ मिळोनी ॥ ६४ ॥
तो वाचक झाला बहुवस । परी त्याचे न चुकती गर्भवास । म्हणोनि सांप्रदाययुक्त गुरूस । शरण जावे निधरि ॥ ६५ ॥
जरी गुरु केला भलता एक । परी पूर्वसांप्रदाय नसे ठाऊक । जैसे गर्भांधास सम्यक । वर्णव्यक्त स्वरूप न कळेचि ॥ ६६ ॥
असो त्या मंत्राचे पुरश्चरण । उत्तम क्षेत्री करावे पूर्ण । काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य । गोकर्णक्षेत्र आदिकरूनी ॥ ६७ ॥
शिवविष्णुक्षेत्र सुगम । पवित्र स्थळी जपावा सप्रेम । तरी येचिविषयी पुरातन उत्तम। कथा सांगेन ते ऐका ॥ ६८ ॥
श्रवणी पठणी निदिध्यास । आदरे धरावा दिवसेंदिवस । अनुमोदन देता कथेस । सर्व पापास क्षय होय ॥ ६९ ॥
श्रवण मनन निजध्यास । धरिता साक्षात्कार पापास क्षय होय सरस । ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस । श्रवणे पावन सर्व होती ॥ ७० ॥
तरी मथुरानाम नगर । यादववंशी परम पवित्र । दाशार्हनामे राजेंद्र । अति उदार सुलक्षणी ॥ ७१ ॥
सर्व राजे देती करभार । कर जोडोनि नमिती वारंवार । त्यांच्या मुकुटरत्नकिरणें साचार । प्रपदे ज्याची उजळली ॥ ७२ ॥
मुकुटघर्षणे करूनी । किरणे पडली दिसती चरणी । जेणे सत्तावसन पसरूनी । पालाणिली कुंभिनी हे ॥ ७३ ॥
उभारिला यशोध्यज । जेवीं शरत्काळींचा द्विजराज । सकल प्रजा आणि द्विज । चिंतिती कल्याण जयाचे ॥ ७४ ॥
जैसा शुद्धद्वितीयेचा हिमांश । तेवी ऐश्वर्य चढे विशेष । जो दुर्बुद्धिदासीस । स्पर्श न करी कालत्रयी ॥ ७५ ॥
सद्बुद्धिधर्मपत्नीसी रत । स्वरूपाशी तुळिजे रमानाथ । दानशस्त्रे समस्त । याचकांचे दारिद्र्य निवटिले ॥ ७६ ॥
भूभुजांवरी जामदग्न्य । समरांगणी जेवी प्रळयाग्न । ठाण न चळे रणीहून । कुठारघाये भूरुह जैसा ॥ ७७ ॥
चतुर्दश विद्या चौसष्टी कळा । आकळी जेवी करतळीचा आंवळा । जेणे दानमेघें निवटिला । दारिद्र्यधुरोळा याचकांचा ॥ ७८ ॥
बोलणे अति मधुर । मेघ गर्जे जेवी गंभीर । प्रजाजनांचे चित्तमयूर । नृत्य करिती स्वानंदे ॥ ७९ ॥
ज्याचा सेनासिंधू देखोनि अद्भुत । जलसिंधु होय भयभीत । निश्चळ अंबरींचा ध्रुव सत्य । वचन तेवी न चळेचि ॥ ८० ॥
त्याची कांता रूपवती सती । काशीराजकुमारी नाम कलावती । जिचे स्वरूप वर्णी सरस्वती । विश्ववदनेकरूनिया ॥ ८१ ॥
जे लावण्यसागरीची लहरी । खंजनाक्षी बिंबाधरी । खभाषिणी पिकस्वरी । हंसगमना हरिमध्या ॥ ८२ ॥
शशिवदना भुजंगवेणी । अलंकारा शोभा जिची तनु आणी । दशन झळकती जेवी हिरेखाणी । बोलता सदनी प्रकाश पडे ॥ ८३ ॥
सकलकलानिपुण । यालागी कलावती नाम पूर्ण । जे सौंदर्यवैरागरींचे रत्न । जे निधान चातुर्यभूमीचे ॥ ८४ ॥
आंगींचा सुवास न माये सदनात । जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ । नेत्रमिलिंद रुंजी घालित । धणी पाहता न पुरेचि ॥ ८५ ॥
नूतन आणिली पर्णून । मनसिजे आकर्षिले रायाचे मन । बोलावू पाठविले प्रीतीकरून । परी ते न येचि प्रार्थिता ॥ ८६ ॥
स्वरूपशृंगारजाळे पसरोन । आकर्षिला नृपमानसमीन । य ालागी दाशार्हराजा उठोन । आपणचि गेला तिजपाशी ॥ ८७ ॥
म्हणे शृंगारवल्ली शुभांगी । मम तनुवृक्षासी आलिंगी । उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगी । अल्यानंदे सर्वांदेखता ॥ ८८ ॥
तव ते शृंगारसरोवरमराळी । बोले सुहास्यवदना वेल्हाळी । म्हणे म्या उपासिला शशिमौळी । सर्वकाळ व्रतस्थ असे ॥ ८९ ॥
जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत । गर्भिणी किंवा ऋतुस्नात । अमुक्त अथवा व्रतस्थ । वृद्ध अशक्त न भोगावी ॥ ९० ॥
स्त्रीपुरुषे हर्षयुक्त । असावी तरुण रूपवंत । अष्टभोगेकरोनि युक्त । चिंताग्रस्त नसावी ॥ ९१ ॥
पर्वकाळ व्रतदिन निरसून । उत्तमकाळी षडूस अन्न भक्षून । मग ललना भोगावी प्रीतीकरून । राजलक्षण सत्य हे ॥ ९२ ॥
राव काममदे मत्त प्रचंड । रतिभरे पसरोनि दोर्दंड । आलिंगन देता बळे प्रचंड । शरीर त्याचे पोळले ॥ ९३ ॥
लोहार्गला तप्त अत्यंत । तैसी कलावतीची तनु पोळत । तूप वेगळा होऊनि पुसत । कैसा वृत्तान्त सां ग हा ॥ ९४ ॥
शृंगारसदनविलासिनी । मम हृदयानंदवर्धिनी । सकळ संशय टाकुनी । मुळींहुनि गोष्टी सांग ॥ ९५ ॥
म्हणे हे राजचक्रमुकुटावतंस । क्रोधे भरो नेदी मानस । माझा गुरु स्वामी दुर्वास । अनुसूयात्मज महाराज ॥ ९६ ॥
त्या गुरूने परम पवित्र । मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र । तो जपता अहोरात्र । परम पावन पुनीत मी ॥ ९७ ॥
ममांग शीतळ अत्यंत । तव कलेवर पापसंयुक्त । अगम्यागमन केले विचाररहित । अभक्ष्य तितुके भक्षिले ॥ ९८ ॥
मज श्रीगुरुदयेकरोन । राजेंद्रा आहे त्रिकाळज्ञान । तुज जप तप शिवार्चन । घडले नाही सर्वथा ॥ ९९ ॥
घडले नाही गुरुसेवन । पुढे राज्यांती नरक दारुण । ऐकता राव अनुतापेकरून । सद्गदित जाहला ॥ १०० ॥
म्हणे कलावती गुणगंभीरे । तो शिवमंत्र मज देई आदरे । ज्याचेनि जपे सर्वत्रे । महत्पापे भस्म होती ॥ १01 ॥
ती म्हणे हे भूभुजेंद्र । मज सांगावया नाही अधिकार । मी वल्लभा तू प्राण ेश्वर । गुरु निर्धारा तू माझा ॥ 10२ ॥
तरी यादवकुळी गुरु वरिष्ठ । गर्गमुनि महाराज श्रेष्ठ । जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट । विद्या वरिष्ठ तयाची ॥ 10३ ॥
जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी । तैसाच महाराज गर्गमुनी । त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी । शिवदीक्षा घेइंजे ॥ ४ ॥
मग कलावतीसहित भूपाळ । गर्गाश्रमी पातला तत्काळ । साष्टांग नमूनि करकमळ । जोडोनि उभा ठाकला ॥ ५ ॥
अष्टभावे दाटूनि हृदयी । म्हणे शिवदीक्षा मज देई । म्हणूनि पुढती लागे पायी । मिती नाही भावार्थ ॥ 10६ ॥
यावरी तो गर्गमुनी । कृतान्तभगिनीतीरा येऊनी । पुण्यवृक्षातळी बैसोनी । स्नान करवी यमुनेचे ॥ 10७ ॥
उभयतांनी करूनी स्नान । यथासांग केले शिवपूजन । यावरी दिव्य रत्ने आणून । अभिषेक केला गुरूसी ॥ 10८ ॥
दिव्याभरणे दिव्य वस्त्रे । गुरु पूजिला नृपे आदरे । गुरुदक्षिणेसी भांडारे । दाशार्हराये समर्पिली ॥ 10९ ॥
तनुमनधनेंसी उदार । गर्गचरणी लागे नृपवर । असोनि गुरूसी वंचिती जे पामर । ते दारुण निरय भोगिती ॥ ११० ॥
श्रीगुरूचे घरी आपदा । आपण भोगी सर्व संपदा । कैचे ज्ञान त्या मतिमंदा । गुरु ब्रह्मानंदा न भजे जो ॥ १११ ॥
एक म्हणती तनु मन धन । नाशिवंत गुरूसी काय अर्पून । परम चांडाळ त्याचे शठज्ञान । कदा बदन न पहावे ॥ ११२ ॥
धिक् विद्या धिक् ज्ञान । धिक् वैराग्य धिक् साधन । चतुर्वेद शास्त्रे आला पढून । धिक् पठण तयाचे ॥ ११३ ॥
जैसा खरपृष्ठीवरी चंदन । षड्रसी दर्वी व्यर्थ फिरून । जेवी मापे तंदुल मोजून । इकडून तिकडे टाकिती ॥ ११४ ॥
घाणा इक्षुरस गाळी । इतर सेविती रस नव्हाळी । की पात्रात शर्करा साठविली । परी गोडी न कळे तया ॥ ११५ ॥
असो ते अभाविक खळ । तैसा नव्हे तो दाशार्हनृपाळ । षोडशोपचारे निर्मळ । केले पूजन गुरूचे ॥ ११६ ॥
उभा ठाकला कर जोडून । मग तो गर्गे हृदयी धरून । मस्तकी हस्त ठेवून । शिवपंचाक्षर मंत्र सांगे ॥ ११७ ॥
हृदयआकाश भुवनी । उगवला निजबोधतरणी । अज्ञानतम तेचि क्षणी । निरसूनि नवल जाहले ॥ ११८ ॥
अडत मंत्राचे महिमान । रायाचिया शरीरामधून । कोट्यवधि काक निघोन । पळते झाले तेधवा ॥ ११९ ॥
कितीएकांचे पक्ष जळाले । चरफडतचि बाहेर आले । अवघेचि भस्म होऊनी गेले । संख्या नाही तयांते ॥ १२० ॥
जैसा किंचित पडता कृशान । दग्ध होय कंटकवन । तैसे काक गेले जळोन । देखोनि राव नवल करी ॥ १२१ ॥
गुरूसी नमोनि पुसे नृप । काक कैचे निघाले अमूप । माझे झाले दिव्य रूप । निर्जरांहूनि आगळे ॥ १२२ ॥
गुरु म्हणे ऐक साक्षेपे । अनंत जन्मींची महापापे । बाहेर निघाली काकरूपे । शिवमंत्रप्रतापे भस्म झाली ॥ १२३ ॥
निष्पाप झाला नृपवर । गुरूस्तवन करी वारंवार । धन्य पंचाक्षरी मंत्र । तू धन्य गुरु पंचाक्षरी ॥ १२४ ॥
पंचभूतांची झाडणी करून । सावध केले मजलागून । चारी देह निरसून । केले पावन गुरुराया ॥ १२५ ॥
पंचव ीस तत्त्वांचा मेळ । त्यांत सापडलो बहुत काळ । क्रोधमहिषासुर सबळ । कामवेताळ घुसधुसी ॥ १२६ ॥
आशा मनशा तृष्णा कल्पना । भ्रांति भूली इच्छा वासना । या जखिणी यक्षिणी नाना । विटंबीत मज होत्या ॥ १२७ ॥
ऐसा हा अवघा मायामेळ । तुवा निरसिला तात्काळ । धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ । गुरु दयाळ धन्य तू ॥ १२८ ॥
सहस्रजन्मपर्यंत । मज ज्ञान झाले समस्त । पापे जळाली असंख्यात । काकरूपे देखिली म्या ॥ १२९ ॥
सुबर्णस्तेय अभक्ष्यभक्षक । सुरापान गुरुतल्पक । परदारागमन गुरुनिंदक । ऐसी नाना महत्पापे ॥ १३० ॥
गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक । स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक । परनिंदा पशुहिंसक । वृत्तिहारक अगम्यस्त्रीगमन ॥ १३१ ॥
मित्रद्रोही गुरुद्रोही । विश्वद्रोही वेदद्रोही । प्रासादभेद लिंगभेद पाही । पंक्तीभेद हरिहरभेद ॥ १३२ ॥
ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षिघातक । पाखांडमति मिथ्यावादक । भेदबुद्धि भष्टमार्गस्थापक । स्त्रीलंपट दुराचारी ॥ १३३ ॥
कृतघ्न परद्रव्यापहारक । कर्मश्रष्ट तीर्थमहिमाउच्छेदक । बकध्यानी गुरुछळक । मातृहतक पितुहत्या ॥ १३४ ॥
दुर्बलघातुक कर्ममार्गघ्न । दीनहत्यारी पाहती पैशून्य । तृणदाहक पीडिती सज्जन । गोत्रवध भगिनीविध ॥ १३५ ॥
कन्याविक्रय गोविक्रय । हयविक्रय रसविक्रय । ग्रामदाहक आत्महत्या पाहे । भ्रूणहत्या महापापे ॥ १३६ ॥
ही महापापे सांगितली । क्षुद्रपापे नाही गणिली । इतुकी काकरूपे निघाली । भस्म झाली प्रत्यक्ष ॥ १३७ ॥
काही गाठी पुण्य होते परम । म्हणोनि नरदेह पावलो उत्तम । गुरुप्रतापे तरलो निःसीम । काय महिमा बोलू आता ॥ १३८ ॥
गुरूस्तवन करूनि अपार । ग्रामासी आला दाशार्ह नृपवर । सवे कलावती परम चतुर । केला उद्धार रायाचा ॥ १३९ ॥
जपता शिवमंत्र निर्मळ । राज्य वर्धमान झाले सकळ । अवर्षणदोष दुष्काळ । देशातूनि पळाले ॥ १४० ॥
वैधव्य रोग आणि आणि मृत्य । नाहीच कोठे देशात । आलिंगिता कलावतीसी नृपनाथ । शशीऐसी शीतळ वाटे ॥ १४१ ॥
शिवभजनी लाविलें सकळ जन । घरोघरी होत शिवकीर्तन । रुद्राभिषेक शिवपूजन । ब्राह्मणभोजन यथविधि ॥ १४२ ॥
दाशार्हरायाचे आख्यान । जे लिहिती ऐकती करिती पठण । प्रीतीकरूनि ग्रंथरक्षण । अनुमोदन देती जे ॥ १४३ ॥
सुफळ त्यांचा संसार । त्यासी निजांगे रक्षी श्रीशंकर । धन्य धन्य तेचि नर । शिवमहिमा वर्णिती जे ॥ १४४ ॥
पुढे कथा सुरस सार । अमृताहूनि रसिक फार । ऐकोत पंडित चतुर । गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे ॥ १४५ ॥
पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी । श्रीधरमुख निमित्त करूनि । तोचि बोलवीत विचारोनी । पहावे मनी निधरि ॥ १४६ ॥
श्रीधरवरद पांडुरंग । तेणे शिरी धरिले शिवलिंग । पूर्ण ब्रह्मानंद अभंग । नव्हे विरंग कालत्रयी ॥ १४७ ॥
शिवलीलामृत ग्रथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड । परिसोत सज्जन अख ंड । प्रथमाध्याय गोड ॥ १४८ ॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
shri shiv leelamrut adhyay 1 shiv lilamrut